रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर आधारित " भूमिका" हा रहस्य प्रधान आणि रोमांचक असा नाट्यानुभव आहे. कित्येक वर्षांपूर्वी " रणमर्द" नावाचं नाटक त्यातला मुख्य अभिनेता "गुरूनाथ" याच्या नाटकादरम्यान घडलेल्या अपघाती मृत्यूमुळे बंद पडलेले असतं. " गुरूनाथ" ही भूमिका दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला करून देत नाहीत या अफवेच्या भीतीपोटी नाटकाचे प्रयोग थांबलेले असतात. पण याच अफवांना challenge करण्यासाठीं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजच्या काळातला आजच्या अभिनय शैलीत काम करणारा प्रसिद्ध अभिनेता " चैतन्य प्रभू" हे नाटक स्विकारतो आणि कथेला कलाटणी मिळते. सत्य आणि अफवा , कलाकार आणि त्याची कला यातील सीमारेषा धुरस व्हायला लागतात आणि चैतन्य ला गुरूनाथांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. नाटकाचा रंगमंच ही चैतन्य आणि गुरूनाथ दोघांमधली रणभूमी होऊन जाते. कथेचा मूळ गाभाच गूढ असल्यानं नाटक शेवटपर्यंत प्रेक्षकांना हुलकावणी देत राहत. गूढ संहितेला आवश्यक वेधक दृश्ययोजना, नाटकाची वेगवान लय आणि नाटक पुन्हा पाहायला लावणारा अनपेक्षित शेवट एकत्रितरित्या प्रेक्षकाला एका वेगळ्या मितीत नेऊ पाहतो आणि हा ७५ मिनिटांचा थरारक अनुभवच नाटकाचा केंद्रबिंदू ठरतो.या नाटकात चिन्मय पटवर्धन, गौरव बर्वे, स्वानंद पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका असून नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन गौरव बर्वे आणि चिन्मय पटवर्धन यांनी केले आहे.प्रणित कुलकर्णी प्रस्तुत या नाटकाची निर्मिती स.प महाविद्यालयाच्या सहयोगाने अमोघ इनामदार आणि गजानन देशमुख यांनी केली आहे. रहस्य आणि भयकथा वाचायला बघायला आवडणाऱ्या लोकांना हे नाटक नक्कीच भावेल याची खात्री वाटते.